
भडगाव | प्रतिनिधी
भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव पश्चिम जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, भडगाव येथील युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते विकास सुरेश महाजन यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
विकास महाजन यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले असून सामाजिक कार्य, संघटन कौशल्य आणि युवकांमध्ये सक्रिय सहभाग यामुळे त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. व्यवसाय क्षेत्रातही ते कार्यरत असून भडगावमधील प्रसिद्ध हॉटेल गायत्री भोजनालयचे ते संचालक आहेत.
त्यांच्या सार्वजनिक कार्याची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवक म्हणून झाली. संघटनात्मक काम करताना त्यांनी विविध जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडल्या. भाजपामध्येही त्यांनी सक्रिय भूमिका बजावत भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस म्हणून कार्य केले आहे. तालुका आणि जिल्हास्तरावर संघटन वाढीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
सामाजिक क्षेत्रातही विकास महाजन यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. माळी समाजाच्या विविध संघटनांमध्ये त्यांनी नेतृत्व करत महाराष्ट्र माळी महासंघात जिल्हा उपाध्यक्ष अशा पदांवर जबाबदारी सांभाळली आहे.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत भाजपा युवा मोर्चाकडून त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या निवडीबद्दल मित्रपरिवार, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




