
पाचोरा प्रतिनिधी :
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूलने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एस.एस.सी.) परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. यंदा विद्यालयाचा एकूण निकाल ८७.२० टक्के लागला असून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.विद्यालयातून परीक्षेसाठी एकूण ४६१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ४०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८१ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबत शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे विद्यालयाने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये ललित बळवंत आंबेकर याने ९४.६ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. हर्षल शैलेंद्र चौधरी याने ९३.४ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर मोहित गणेश पाटील याने ९२ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. स्वरूप अशोक राठोड याने ९१ टक्के गुण मिळवत चतुर्थ क्रमांक मिळविला असून खुशी मनोहर सोनवणे हिने ९० टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार भाऊसो. दिलीप ओंकार वाघ, चेअरमन नानासो. संजय ओंकार वाघ, मानद सचिव दादासो. ॲड. महेश देशमुख, व्हॉइस चेअरमन नानासो. व्ही. टी. जोशी, शालेय समिती चेअरमन दादासो. खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन अण्णासो. वासुदेव महाजन यांनी अभिनंदन केले.
तसेच मुख्याध्यापक श्री. एन. आर. पाटील (ठाकरे), उपमुख्याध्यापक श्री. आर. एल. पाटील, पर्यवेक्षिका सौ. ए. आर. गोहिल, पर्यवेक्षक श्री. आर. बी. बांठिया, श्री. महेश कौंडिण्य, किमान कौशल्य विभाग प्रमुख श्री. मनीष बाविस्कर, कार्यालयीन प्रमुख श्री. अजय सिनकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्यालयाच्या या यशामुळे पाचोरा तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून श्री. गो. से. हायस्कूलच्या शैक्षणिक गुणवत्तेचा लौकिक पुन्हा अधोरेखित झाला आहे.




