
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेचा अविभाज्य भाग असलेल्या शारीरिक शिक्षण (क्रीडा) शिक्षकांच्या भरतीबाबत शासन कमालीची उदासीनता दाखवत असल्याचा आरोप करत, ‘महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाने’ आता थेट आरपारचा लढा पुकारला आहे. येत्या सोमवार, २७ एप्रिल २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदान येथे राज्यभरातील हजारो बी.पी.एड् व एम.पी.एड् TAIT धारक पात्र बेरोजगार उमेदवार बेमुदत धरणे आंदोलनाला बसणार आहेत.
काय आहे मुख्य प्रश्न?
राज्यात गेल्या १५ वर्षांपासून शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या पदभरतीकडे शासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. यामुळे बी.पी.एड. (B.P.Ed) आणि एम.पी.एड. (M.P.Ed) पदवी धारण केलेले हजारो तरुण आजही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाने एकूण ४८६० विशेष क्रीडा शिक्षक पदांना मंजुरी दिली असली, तरी अद्याप सेवा प्रवेश नियमावली आणि अटी निश्चित केलेल्या नाहीत. परिणामी, पदं मंजूर असूनही भरती प्रक्रिया रखडलेली असल्याने उमेदवारांमध्ये तीव्र संताप आहे.
महासंघाच्या प्रमुख ४ मागण्या:
१) १००% पदभरती: २ जानेवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद केंद्र स्तरावरील क्रीडा शिक्षकांची सर्व १००% पदे ‘पवित्र पोर्टल’ (TAIT-2025) च्या पहिल्या टप्प्यातच भरण्यात यावीत.
यानुसार रिक्त होणाऱ्या पदांवर इतर विषय शिक्षकांचे समायोजन न करता, ती पदे शारीरिक शिक्षण शिक्षकांसाठी राखीव ठेवून भरती करावी.
२ ) पारदर्शक प्रक्रिया: जिल्हा परिषद, केंद्रशाळा, माध्यमिक, नगरपालिका, शासकीय आश्रमशाळा व समाजकल्याण विभागातील सर्व शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांची भरती केवळ पवित्र पोर्टलद्वारेच व्हावी.
३ ) भरतीला गती द्या: पवित्र पोर्टल मार्फत सुरू असलेली TAIT २०२५ ची भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न
शारीरिक शिक्षण हा केवळ खेळाचा विषय नसून विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाचा पाया आहे. ऑलिम्पिक पदकांचे स्वप्न पाहणाऱ्या देशात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक नसल्यामुळे योग्य मार्गदर्शन मिळत नाहीये. शासनाच्या या “ढिसाळ कारभारामुळे” विद्यार्थ्यांचे आणि सुशिक्षित बेरोजगारांचे मोठे नुकसान होत असल्याची भावना महासंघाने व्यक्त केली आहे.
नेतृत्वाचे आवाहन
या आंदोलनाचे नियोजन युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. प्रदुम्न जोशी, श्री. कैलास माने, श्री. विश्वनाथ पाटोळे, श्री. अमोल जोशी, युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष श्री. संदीप मनोरे , राज्य सचिव प्रा.श्री.तायाप्पा शेंडगे आदींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या लढ्यात महाराष्ट्र मधील सर्व युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे विभागीय व जिल्हा पदाधिकारी, सदस्य आणि पात्र उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“आम्ही अन्यायाविरुद्ध शिंग फुंकले आहे. जोपर्यंत आमचा हक्क मिळत नाही, तोपर्यंत आझाद मैदानावरून हटणार नाही!” – महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ.







